लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओम प्रकाश राजभर यांनी भाजपा देशात दंगली घडवेल, असं वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालाचा हवाला देत त्यांनी हा दावा केला आहे. ते भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज(एसबीएसपी)चे प्रमुख आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, बलियातल्या बांसडीहमधल्या सैदपुरा गावातील एका जनसभेला संबोधित करताना राजभर यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भाजपा देशात दंगली घडवेल, देशात दंगली होऊ शकतात, त्यामुळे जनतेनं हिंदू-मुस्लिमांच्या नावानं भांडू नये, दंगलीत कोणत्याही नेत्याचा नव्हे, तर सामान्य व्यक्तीचाच जीव जातो, असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला होता. अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली होती. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे.
रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं.