अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठी भाजपा माझी बनावट सेक्स सीडी जारी करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकते, असा धक्कादायक दावा पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलनं केला आहे. शिवाय, निवडणुकीत खराब व्हीव्हीपीएटी यंत्रांचाही वापर होऊ शकतो, असा आरोपही हार्दिकनं केला आहे.
शुक्रवारी हार्दिकनं असा आरोप केला आहे की, ''मला बदनाम करण्यासाठी भाजपानं माझी बनवाट सेक्स सीडी बनवली आहे. ही सीडी बरोबर निवडणुकीपूर्वी जारी करण्यात येईल. याहून भाजपाकडून आणखी काय अपेक्षा केली जाऊ शकते. म्हणून प्रतीक्षा करा, पाहा आणि आनंद घ्या''. दरम्यान, सीडीबाबतची माहिती कशी समजली, असा प्रश्न हार्दिकला विचारण्यात आला तेव्हा त्यानं सांगितलं की, हेच भाजपाचं वैशिष्ट्य आहे. तर दुसरीकडे, हार्दिकनं केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यासाठी गुजरातमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष जीतू वघानी यांनी नकार दिला आहे.
दरम्यान, गुजरात निवडणुकीत खराब व्हीव्हीपीएटी यंत्रांचा वापर केला जाऊ शकतो, असा आरोपही हार्दिकनं यावेळी केला आहे. निवडणूक आयोगाच्या पहिल्या टप्प्यातील तपासणीमध्ये 3550 व्हीव्हीपीएटी यंत्र फेल ठरली आहेत, असेही त्यानं सांगितले. त्यामुळे भाजपा आता गडबडगोंधळ करुन निवडणूक लढणार, असा पूर्ण दावा असल्याचंही हार्दिक म्हणाला आहे.
दरम्यान, या वादावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण जारी केले आहे. निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील तपासणीमध्ये 3ते4 टक्के ईव्हीएम/ व्हीव्हीपीएटी यंत्रांचं फेल होणं सामन्य गोष्ट आहे. गुजरात निवडणुकीत 70 हजार व्हीव्हीपीएटी यंत्रांचा वापर होणार आहे आणि यामधील 5 टक्के यंत्रं फेल होऊ शकतात. कर्मचारी पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी यंत्राचा वापर करत असल्याकारणानं यंत्र खराब होण्याची शक्यता अधिक आहे.
सदोष निघालेल्या मतदान पावती यंत्रांची संख्या जामनगर, देवभूमी, द्वारका, पतन या जिह्यांत अधिक आहे असे सूत्रांनी सांगितले. गुजरातची निवडणूक दोन टप्प्यांत होणार असून त्यात आपले मत कोणत्या चिन्हाला गेले याची पावती मतदारांना मिळणार आहे. त्यासाठी 70 हजार 182 मतदान पावती यंत्रांचा वापर केला जाणार आहे.
दरम्यान, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल काँग्रेससोबत जात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. गुजरातमध्ये दीर्घकाळापासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने भाजपाला हरवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळेच सध्या गुजरातमधील भाजपा आणि मोदींच्या विरोधकांना एकत्र आणून त्यांची मोट बांधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. दुसरीकडे हार्दिक पटेलनी काँग्रेसला आपली भूमिका मांडण्यासाठी 3 नोव्हेंबरपर्यतचा म्हणजे आजपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेससोबत जाणार की नाही याबाबत लवकरच त्यांच्याकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मागण्या मान्य न केल्यास काँग्रेसला चेतावणी देताना सुरतमध्ये जे अमित शाह यांच्यासोबत झालं तेच काँग्रेसससोबत होईल, असं त्यांनी सांगितलं होतं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या सुरतमधील रॅलीत प्रचंड गोंधळ होता आणि लोकांनी खुर्च्यांची तोडफोड केली होती.