“...तर २०२४ च्या निवडणुकीत भाजप ४००हून अधिक जागा जिंकू शकतो”; काँग्रेस नेत्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 05:31 AM2023-12-29T05:31:56+5:302023-12-29T05:33:57+5:30
आगामी निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल, असेही ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनशी (ईव्हीएम) संबंधित मुद्द्यांचा सोक्षमोक्ष न लावल्यास भाजप २०२४च्या निवडणुकीत ४००हून अधिक जागा जिंकू शकतो, असे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी गुरुवारी येथे म्हटले. एका मुलाखतीत त्यांनी ‘ईव्हीएम’बाबत चिंता व्यक्त केली. आगामी निवडणूक भारताचे भवितव्य ठरवेल, असेही ते म्हणाले.
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी १०० टक्के ‘व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल’ची (व्हीव्हीपॅट) मागणी केली असून, या स्लिप बॉक्समध्ये ठेवण्याऐवजी मतदारांना द्याव्यात, असे सुचविले आहे. संपूर्ण देश राम मंदिरात अडकला आहे, असे पित्रोदा यांनी म्हटल्याचे एका वृत्तात म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.
आपल्याला कोणत्या प्रकारचे राष्ट्र निर्माण करायचे आहे? राज्यघटनेत नमूद असल्याप्रमाणे सर्व धर्मांचा आदर केला जाणारा देश घडवायचा आहे की, एखाद्या धर्माच्या वर्चस्वाच्या आधारावर राष्ट्र निर्माण करायचे आहे?’ असा सवाल त्यांनी केला.