जगभरात पुन्हा एकदा फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली जन आक्रोश यात्रा स्थगित करण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, भाजपने राजस्थानमध्ये सुरू असलेली जनआक्रोश यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना, राहुल गांधींनीही यासंदर्भात विचार करायला हवा. किमान कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन तरी करायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.
खरे तर, भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारविरोधात जन आक्रोश यात्रा सुरू केली होती. मात्र आता ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 1 डिसेंबरपासून या यात्रेची सुरुवात केली होती. ही यात्रा 75000 किलोमीटरपर्यंत चालणार होती.
अरुण सिंह म्हणाले, “भाजपसाठी आधी देश आणि जनता आहे, त्यानंतर राजकारण. आमच्यासाठी जनतेची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य अधिक महत्वाचे आहे.” अरुण सिंह यांनी भारत जोडो यात्रा स्थगित न गेल्याने, काँग्रेसवर निशाणा साधत, काँग्रेस राजकीय फायद्यासाठी जनतेच्या जीवाशी खेळत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा फ्लॉप शो असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मांडविया यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाही कोरोनाच्या धोक्यासंदर्भात पत्र लिहून भारत जोडो यात्रा थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या पत्रावर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी, भाजपच्या यात्रेत लोक सहभागी होत नसल्याचे आपण पाहत आहोत, लोकही भाजपच्या यात्रेत उत्साह दाखवत नाहीत, असे भाष्य केले होते. यामुळे आता राहुल गांधी त्यांची यात्रा थांबवणार का, हे पाहावे लागेल.