BJP Candidate 14th List: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची 14 वी लिस्ट जारी केली आहे. या नवीन यादीत लडाखच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. भाजपने विद्यमान खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांचे तिकीट कापून ताशी ग्याल्सन (Tashi Gyalson) यांना उमेदवारी दिली आहे. नामग्याल भाजपच्या काही प्रसिद्ध खासदारांपैकी एक होते. दरम्यान, लडाखमध्ये स्थानिक विरोधामुळे भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
कलम 370 वरील भाषणामुळे चर्चेत...लडाखचे विद्यमान भाजप खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी 6 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत कलम 370 वरील चर्चेदरम्यान जोरदार भाषण केले होते. त्यांचे भाषण इतके व्हायरल झाले की, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करुन त्यांचे कौतुक केले होते.
कोण आहेत ताशी ग्याल्सन ?ताशी ग्याल्सन हे प्रदीर्घ काळापासून भाजपशी संबंधित आहेत. आता ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. सध्या त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद असून, ते हिल डेव्हलपमेंट कौन्सिलचे एक्झिक्युटिव्ह कौन्सिलर आहेत. याशिवाय ताशी व्यवसायाने वकील आहेत. येथे त्यांची काँग्रेस पक्षाचे उमेदवार नवांग रिग्जिन जोरा यांच्याशी स्पर्धा आहे.
लडाखमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहेलडाखमध्ये 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 3 मे ठेवण्यात आली असून, उमेदवारांना 6 मेपर्यंत नावे मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
मतदान आणि निकाल कधी?लोकसभेच्या निवडणुका यावेळी सात टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यांतर्गत 19 एप्रिल 2024 रोजी (102 जागांवर) मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यांत 26 एप्रिल रोजी 89, तिसऱ्या टप्प्यांतर्गत 7 मे रोजी 94, चौथ्या टप्प्यांतर्गत १३ मे रोजी 96, पाचव्या टप्प्यांतर्गत 20 मे रोजी 49, सहाव्या टप्प्यांतर्गत 25 मे रोजी 57 आणि सातव्या टप्प्यांतर्गत 1 जून रोजी लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. तर, 4 जून 2024 रोजी निकाल जाहीर केले जातील.