Haryana Assembly Election 2024: हरियाणात ५ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगटला येथून उमेदवारी दिली आहे. तर भाजपनेही मंगळवारी या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केला.
भाजपनं ३५ वर्षीय कॅप्टन योगेश बैरागी यांना जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. भाजपकडून तिकीट मिळाल्यानंतर योगेश बैरागी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जुलाना विधानसभेचे तिकीट देऊन पक्षानं माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानू इच्छितो, असे योगेश बैरागी म्हणाले.
यावेळी कॅप्टन योगेश बैरागी यांनी काँग्रेस उमेदवार विनेश फोगट हिच्याबद्दल सुद्धा भाष्य केलं. ते म्हणले, "ती आमच्या बहिणीसारखी आहे आणि जोपर्यंत ती खेळत होती, तोपर्यंत तिने देशाचा गौरव केला आहे. आता ती काँग्रेसची उमेदवार आहे आणि मी भाजपचा उमेदवार आहे, त्यामुळं माझे काम येथून पक्षाला जिंकून द्यायचे आहे. त्यासाठी मी कठोर परिश्रम करेन."
पुढे योगेश बैरागी म्हणाले की, "माझ्या जुलना विधानसभेतील व माझ्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठांना मी हात जोडून आवाहन करेन की, मला सेवेची संधी द्यावी. जुलानामध्ये माझा विकास आणि बंधुभावाच्या क्रांतीचा आदर्श राहील." तसेच, यावेळी माहिती देताना योगेश बैरागी यांनी सांगितले की, ते १२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
एअर इंडियाची नोकरी सोडून राजकारणात योगेश बैरागी यांनी एअर इंडियातील सीनियर कॅप्टनची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला आदर्श मानतात. योगेश बैरागी हे जींद जिल्ह्यातील सफिदोनचा रहिवासी आहे. तसंच, योगेश बैरागी हे हरियाणा भाजपच्या युवा मोर्चा युनिटचे उपाध्यक्ष देखील आहेत.