नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपा उमेदवार मुमताज अली (BJP Mumtaz Ali) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नसल्याचं सांगत आपली उमेदवारी आता मागे घेतली आहे. हा भाजपासाठी एक धक्का मानला जात आहे. पक्षाने आपल्याला पाठींबा दिला नाही. तसेच फोन केला तर त्याचंही उत्तर दिलं जात नाही त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं अली यांनी म्हटलं आहे. "मला निवडणुकांमधून माघार घ्यायची नव्हती. पण ज्या दिवशी मी माझा उमेदवारी अर्ज भरायला गेले, तेव्हा माझ्या निवडणूक प्रतिनिधीशिवाय पक्षातील कोणीही उपस्थित नव्हतं" अशी माहिती मुमताज अली यांनी दिली आहे.
अली यांनी "आमच्या पक्ष नेतृत्वाने माझ्या फोनला प्रतिसाद दिला नाही. अर्ज छाननीच्या दिवशी मी एकटीच गेले होते. त्यादिवशी तर माझा निवडणूक प्रतिनिधीही गैरहजर होता. जेव्हा मी इतर पक्षांचे उमेदवार त्यांच्या समर्थकांसह येताना पाहिले तेव्हा मला खूप वाईट वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी ऑफिसमध्येही शिरले नाही. एका हवालदाराला उमेदवारी अर्ज कसा मागे घ्यावा, असे विचारले. त्यानंतर मी दुपारपर्यंत पक्षाकडून प्रतिसाद येण्याची वाट पाहिली आणि अखेर माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला" असं म्हटलं आहे.
"स्वत:च्या उमेदवारांची कल्पना नाही"
"बंगालच्या भाजपा नेतृत्वाला आपण निवडणुकीतून माघार घेतली हे माहीत देखील नव्हते. माध्यमातून बातमी मिळाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी मला फोन केला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख अग्निमित्र पॉल यांनी मला फोन केला आणि मुमताज दादा घरी आहेत का, अशी विचारणा केली. महिला असूनही त्यांनी उमेदवाराला दादा म्हटले. त्यांना स्वत:च्या उमेदवारांची कल्पना नाही. त्यामुळे ते आम्हाला किती महत्त्व देतात याची तुम्ही कल्पना करू शकता" असं म्हणत मुमताज अली यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
"मी भाजपात किती काळ टिकू शकेन याची खात्री नाही; कामाची संधी मिळेल त्या पक्षात जाईन"
आगामी कोलकाता महानगरपालिका निवडणुकीसाठी अली प्रभाग 134 मधून बंगाल भाजपाच्या उमेदवार होत्या. उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्यांनी आपल्या पक्षाकडून पाठिंबा नसल्यामुळे माघार घेतली. "मला जाणूनबुजून अशा जागेवर निवडणूक लढवायला पाठवले जिथे मला 10 मतेही मिळणार नाहीत. मला खूप असहाय्य वाटतंय. मला मदत करण्यासाठी इथे कोणीही नाही. मी या पक्षात किती काळ टिकू शकेन याची मला खात्री नाही. जो पक्ष मला काम करण्याची संधी देईल, मी त्या पक्षात जाईन" असं देखील मुमताज अली यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.