BJP Candidate List 2024 : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ३४ केंद्रीय मंत्र्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवार नाही. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांचेही नाव पहिल्या यादीत नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी कधी जाहीर होणार? याची उत्सुकता अनेक नेत्यांना लागली आहे.
लोकसभेच्या उर्वरित जागांच्या उमेदवारांबाबत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक उद्या (६ मार्च) होणार आहे. यादरम्यान पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या उर्वरित जागांसाठी उद्या आणि परवा असे दोन दिवस दिल्लीत कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहू शकतात. कोअर कमिटीच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी उमेदवारांबाबत विचारमंथन होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा करताना भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत अनेक दिग्गजांना बाजूला करण्यात आले. आता दुसऱ्या यादीबाबतही चर्चा रंगली आहे. दुसऱ्या यादीत सुद्धा अनेकांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, दिल्लीत होणाऱ्या या कोअर कमिटीच्या बैठकीत दुसऱ्या यादीतील नावे निश्चित केली जाणार आहेत. त्यानंतर ७ किंवा ८ मार्च रोजी दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांची नावे असू शकतात.
'या' उमेदवारांची तिकिटे कापली जाणार का?पहिल्या यादीत अनेकदा वादात सापडलेल्या किंवा वादग्रस्त विधाने करणाऱ्या खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूर, रमेश बिधुरी आणि प्रवेश वर्मा या खासदारांच्या नावांचा समावेश आहे. दुसऱ्या यादीतील वादग्रस्त चेहरेही भाजपा दूर करू शकतो, असे म्हटले जात आहे. यामध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याही नावाची शक्यता आहे. कारण, महिला कुस्तीपटूंनीही ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. याशिवाय, सुलतानपूर आणि पिलीभीतच्या जागांवरही उमेदवार बदलण्याची चर्चा आहे. मनेका गांधी आणि वरुण गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांबाबत दुसऱ्या यादीत काय होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, याबाबत भाजपकडून कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत.
पहिल्या यादीत किती उमेदवार?भाजपाने १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उत्तर प्रदेशातील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशातील २४, गुजरातमधील १५, राजस्थानमधील १५, केरळमधील १२, तेलंगणातील ९, आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीतील ११ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच, जम्मू-काश्मीरच्या ५, उत्तराखंडच्या ३, अरुणाचलच्या २, गोव्याच्या १ , त्रिपुराच्या १, अंदमानच्या १, दमण आणि दीवच्या १ जागेसाठी देखील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.