मध्य प्रदेशमध्ये भाजपाने विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यावरून राजकारण तापलं आहे. भाजप आणि काँग्रेसचे नेते सातत्याने एकमेकांवर आरोप करत विजयाचे दावे करत आहेत. भाजपाने दुसऱ्या यादीत तीन केंद्रीय मंत्री आणि सात खासदारांसह एकूण 39 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री आणि खासदारांना तिकीट देण्यावरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी निशाणा साधत हे भाजपा घाबरल्याचं लक्षण असल्याचं म्हटलं आहे.
राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा घाबरलेला आहे, त्यामुळे त्यांना तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे. पराभवाच्या भीतीने भाजप घाबरला आहे, त्यामुळेच मोठ्या नेत्यांना तिकीट देऊन मध्य प्रदेशात प्रवेश दिला जात आहे. विधानसभा निवडणुकीतील मुद्द्यांचा संदर्भ देत दिग्विजय सिंह म्हणाले की, व्यापम घोटाळा हा यावेळी निवडणुकीचा मुद्दा असेल.
गेल्या वेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखाली 20 हून अधिक काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांबाबत दिग्विजय सिंह म्हणाले, यावेळी टिकाऊ लोकांना काँग्रेसचे तिकीट मिळेल, या वेळी विकले जाणाऱ्या लोकांना संधी मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत दिग्विजय सिंह म्हणाले की, अशी भाषा तुम्ही कोणत्याही पंतप्रधानांकडून ऐकली आहे का? पंतप्रधान मोदी इतक्या खालच्या पातळीवर बोलतात की त्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी केली हे खेदजनक आहे.
भाजपाच्या दुसऱ्या यादीत प्रमुख नेत्यांना तिकीट
भाजपाने सोमवारी 39 उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांना तिकीट देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारचे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांच्यासह ग्रामीण विकास आणि स्टील राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले आहे. भाजपाने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिमानी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे, तर फग्गन सिंह कुलस्ते यांना निवास विधानसभा मतदारसंघातून आणि प्रल्हाद पटेल यांना नरसिंहपूरमधून उमेदवारी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.