नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरलाअसतानाच भाजपाच्या एका उमेदवाराने या निवडणुकीत आपला पराभव निश्चित असल्याचे गृहीत धरले आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदार संघातील भाजपा उमेदावर कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी निवडणुकीच्याआधीच आपला पराभव निश्चित असल्याचे म्हटले आहे.
कुंवर सर्वेश कुमार सिंह यांना भाजपाने मुरादाबाद मतदार संघातून दुसऱ्यांदा तिकीट दिले आहे. या मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. मुरादाबाद मतदार संघातून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून येण्याची साशंकता कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना व्यक्त केली आहे. मुस्लीम मतदार एकत्र आल्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कुंवर सर्वेश कुमार सिंह निवडून येण्याची शक्यता कमी आहे. गेल्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत मुरादाबाद मतदार संघातून कुंवर सर्वेश कुमार सिंह विजयी झाले होते. मात्र, यावेळी येथील परिस्थिती उलट असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांनी मुरादाबाद संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर, सपा-बसपा-रालोद या आघाडीने एस. टी. हसन यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेस आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार मुस्लीम आहेत. त्यामुळे मुस्लीम समुदायातील मतांचं विभाजन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र,आता तसे होताना दिसत नाही, कारण मुस्लीम मतदार मताचं विभाजन होऊ देणार नाहीत तर एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुस्लीम समुदायाची मते मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रचार करताना चांगलीच तारांबळ उडणार आहे.