नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाला कालपासून सुरुवात झाली आहे. देशात लोकसभेच्या 91 जागांसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी भाजपाच्या एका उमेदवाराने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (Citizenship Amendment Bill) विरोध दर्शविला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर होऊ देणार नाही. जर नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आत्महत्या करेन, असे या भाजपाच्या उमेदवाराने म्हटले आहे.
मेघालयात लोकसभेच्या दोन जागा आहेत. एक शिलाँग आणि तुरा. या दोन्ही जागा येथील स्थानिक आदिवासी समुदायांसाठी आरक्षित आहेत. काल, 11 एप्रिलला या लोकसभेच्या दोन्ही जांगासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. यावेळी भाजपाचे उमेदवार सनबोर शुलाई यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध केला आहे. मेघालयातील शिलाँग मतदार संघातून सनबोर शुलाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
'मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत नागरिकत्व सुधारणा विधेयक लागू होऊ देणार नाही. यासाठी मला जीव द्यावा लागला तरी चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मी आत्महत्या करेन. मात्र, नागरिकत्व सुधारणा विधेयक अमलात आणू देणार नाही', असे सनबोर शुलई यांनी म्हटले आहे.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध का?जर नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाले तर ईशान्य भारतातल्या स्थानिक लोकांच्या सांस्कृतिक अस्मितेला धक्का पोहोचेल अशी भीती वाटत असल्यामुळे अनेक संस्थासह पक्ष याचा विरोध करत आहेत. तसेच, नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले तर बांगलादेशातून आलेल्या निर्वासित हिंदूंची संख्या वाढेल आणि स्थानिकांची कमी होईल अशी भीती आसाममधील नागरिकांना वाटत आहे.