नवी दिल्ली - २०२४ च्या निवडणुकीत भाजपाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट कधी काम करणार नाही कारण ही एकजूट अस्थिर आणि वैचारिकपणे वेगळी असेल असं विधान निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा केवळ दिखाऊपणा आहे आणि पक्ष, नेते एकमेकांसोबत आल्याने हे शक्य होणार नाही असं म्हणत प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या फायद्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, जर तुम्हाला भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकासवाद हे समजून घ्यायला हवं. हे त्रिस्तरीय स्तंभ आहेत. ज्यांना भाजपाला आव्हान द्यायचे आहे त्यांना या तीनपैंकी २ गोष्टींवर सुधारणा करायला हवी. हिंदुत्व विचारधारेशी लढण्यासाठी विविध विचारधारांची आघाडी व्हायला हवी. गांधीवादी, आंबेडकरवादी, समाजवादी आणि डावे यांची विचारधारा खूप महत्त्वाची आहे, पण विचारधारेच्या नावाखाली तुम्ही अंधश्रद्धा करू शकत नाही असा सल्ला किशोर यांनी दिला.
तसेच 'मीडियातील लोक विरोधी आघाडीकडे पक्ष किंवा नेत्यांचे एकत्र येणे म्हणून पाहत आहेत. कोण कोणासोबत जेवतोय, कोणाला चहाला बोलावलंय…पण हे मी विचारधारेच्या आधारे पाहत आहे. वैचारिक युती झाल्याशिवाय भाजपला पराभूत करण्याचा मार्ग नाही. माझी विचारधारा महात्मा गांधींची विचारधारा आहे. बिहारमध्ये जन सुराज यात्रा गांधींच्या काँग्रेसची विचारधारा पुनर्जीवित करण्याचा एक प्रयत्न आहे असंही प्रशांत किशोर यांनी सांगितले.
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये भाजपाचं काम केले होते. नरेंद्र मोदींच्या प्रचारात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. या निवडणुकीपासून ते पुढे आले. प्रशांत किशोर आता 'जन सुराज यात्रे'साठी बिहारच्या दौऱ्यावर आहेत. राज्य समजून घेऊन नवी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा हा केवळ प्रयत्न असल्याचे किशोर यांचे म्हणणे आहे. राजकीय वर्तुळात 'पीके' म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर हे देशात निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. बिहार हे जातीपातीच्या राजकारणासाठी आणि अनेक चुकीच्या कारणांसाठी ओळखले जाते. लोक काय करण्यास सक्षम आहेत यासाठी बिहार ओळखण्याची वेळ आली आहे असं किशोर यांनी म्हटलं.