नवी दिल्ली : काश्मीरमधील अल्पसंख्याकांच्या लक्ष्यीत हत्येमुळे काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यास भाग पाडले जात आहे, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. अशा घटना रोखण्यासाठी केंद्राने कृती योजना तयार करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.जंतर-मंतर येथे काश्मीरमधील लक्ष्यीत हत्येच्या विरोधात आयोजित आम आदमी पार्टीच्या ‘जन आक्रोश’ सभेत ते बोलत होते. या वेळी केजरीवाल म्हणाले की, भाजप काश्मीर हाताळू शकत नाही. भाजपला केवळ घाणेरडे राजकारण करता येते. १९९० मधील पुनरावृत्ती होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जेव्हा जेव्हा भाजपचे सरकार आले, तेव्हा तेव्हा काश्मिरी पंडितांना खोरे सोडण्यास भाग पडले. काश्मीरवरून कृपया राजकारण करू नका.
भारताने ठरविल्यास पाकिस्तान राहणार नाहीकाश्मीरमधील दहशतवादी कारवायांंना पाकिस्तान पाठिंबा देत आहे. पाकिस्तानने आपले तुच्छ डावपेच थांबवावेत. काश्मीर आमचे होते आणि नेहमीच भारताचा भाग असेल. भारताने ठरविले, तर पाकिस्तानचे अस्तित्व राहणार नाही, असे केजरीवाल म्हणाले.