हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर बोचऱ्या शब्दांत निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. प्रचारादरम्यान ओवेसी बंधु भाजपा-काँग्रेसच्या नेत्यांवर विखारी टीका करत आहेत. AIMIMचे खासदार असदद्दुीन ओवेसी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये वार-पलटवार सुरू असताना या वाक् युद्धात आता अकबरुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली आहे. एका जनसभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
हैदराबादमधील चारमिनार विधानसभा मतदारसंघातील रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
('हिंदुस्थान मेरे अब्बा का है, नही जाऊंगा', ओवैसींचा योगींवर पटलवार)
अकबरुद्दीन ओवेसींचे प्रक्षोभक भाषण
'चहा वाल्या, आम्हाला उकसवू नका. चहा-चहा ओरडता, लक्षात ठेवा एवढं बोलेन, एवढं मारेन की कानातून रक्त बाहेर येईल', असे वादग्रस्त विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींसंदर्भात केले आहे.
योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवारअकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, ''आज आणखी एक जण आला आहे. कसे कपडे घालतो तो. एखाद्या तमाशासारखा दिसतो. नशिबानं मुख्यमंत्रीदेखील झाला आहे. म्हणे निजामाप्रमाणे ओवेसीला पळवेन. अरे तुझी लायकी काय आहे?. तुझ्यासारखे 56 आले आणि गेले. अरे ओवेसीला सोडा, त्याच्या पुढे येणाऱ्या 1000 जातीदेखील या देशात राहतील आणि तुमच्या विरोधात लढतील''.
योगी-ओवेसीमध्ये वाक् युद्ध योगी आदित्यनाथ यांनी रविवारी असदुद्दीन ओवेसींवर निशाणा साधला होता. ओवेसींनी ही योगींवर पलटवार केला आहे. हिंदुस्थान मेरे अब्बा का है, मै नही जाऊंगा, असे म्हणत योगींवर पलटवार केला. तसेच तुम्हाला तारीख तर माहिती नाही अन् इतिहासातही शून्य आहात तुम्ही, असे ओवेसी यांनी योगी आदित्यनाथ यांना म्हटले. भाजपा सत्तेत आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे हैदराबाद सोडून पळावं लागेल, असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. यावर ओवेसींनी पलटवार केला आहे.