श्रीनगर- लोकसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ भाजपाकडून हिंदुत्ववादी मुद्दा पुढे करण्यात येत आहे. तर, भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून महाराष्ट्रात भगवा फडकविण्याचे सांगण्यात येते. मात्र, काश्मीरमध्ये भाजपाच्या प्रचार जाहिरातीत भगवेकरण गायब झाल्याचे दिसून येत आहे. श्रीनगर येथे भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ भगव्याऐवजी चक्क हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही फोटो छापण्यात आला आहे. तर, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही भाजपा भगव्यातून हिरव्या रंगात बदलल्याचे म्हटले आहे.
काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शेखर खालिद जहाँगिर यांच्या प्रचारार्थ भाजपाचे हिरवेकरण झाल्याचे दिसून येते. स्थानिक मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शेख खालिद यांनी हिरव्या रंगात आपल्या जाहिराती प्रकाशित केल्या आहेत. वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातींमध्ये भाजपाने भगव्याऐवजी हिरव्या रंगाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या राजकीय प्रचारात प्रथमच ही बाब घडल्याचे निदर्शनास आले आहे. काश्मीरमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र ग्रेटर काश्मीर मध्ये भाजपाने शेख खालिद यांच्या प्रचारार्थ जाहिरात दिली आहे. या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटोही वापरण्यात आला आहे. भाजपाचे नावही हिरव्या रंगात लिहिले आहे. तर, भाजपाचे चिन्ह कमळ हे पांढऱ्या रंगात दिसून येते. खोट सोडा, खरा बोला आणि भाजपाला मत द्या, असा संदेशही उर्दु भाषेत या जाहिरातीवर लिहिण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील भाजपाचे प्रवक्ते अल्ताफ ठाकूर यांनी या जाहिरातींचे समर्थन केले आहे. भाजपाच्या झेंड्यात हिरवा आणि भगवा हे दोन्ही रंग वापरात आहेत. हिरवा रंग शांती आणि प्रगतीचे प्रतिक आहे. भाजपा पक्ष रंगांवर विश्वास ठेवत नसून सबका साथ सबका विकास हेच आमचं ध्येय असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. तसेच, केवळ भाजपाच्याच झेंड्यात सर्वधर्मीय रंगांचा समावेश केला आहे. याउलट पीडीपीचा झेंडा हा हिरवा आहे, तर नॅशनल कॉन्फरन्सचा झेंडा लाल आहे, असेही स्पष्टीकरण ठाकूर यांनी दिले आहे.
दरम्यान, नॅशनल कॉन्फ्रेन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाच्या या जाहिरातबाजीवर टीका केली आहे. काश्मीरमध्ये पोहोचताच भगव्या रंगाची भाजपा हिरव्या रंगात बदलली. भाजपाकडून मतदारांना मूर्ख बनविण्यात येत आहे. काश्मीरमध्ये प्रचारासाठी भाजपा आपल्या खऱ्या रंगाचा वापर का करत नाही, असा प्रश्न ओमर अब्दुल्ला यांनी विचारला आहे.
ओमर अब्दुलांच्या प्रश्नावर उत्तर देताना, भाजपा उमेदवार शेख खालिद यांनी, सर रंग सोडून द्या, माणूस पहा, असे म्हणत शेख खालिद तुमचाच असल्याचे म्हटले. तसेच ओमर अब्दुलांचे आभारही मानले आहेत.