नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे ट्विट गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वघानी यांनी केले असून त्यांनी अमित शहा यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून अमित शहा यांना नरेंद्र मोदींच्या नव्या सरकारमध्ये स्थान मिळणार की नाही, याबाबत राजकीय चर्चांना ऊत आले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा निवडून आले आहेत. तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन सरकारमध्ये त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आज राष्ट्रपती भवनात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी अमित शहा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नवीन कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार आहे. याबाबत गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वघानी यांनी अमित शहा यांचा नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे ट्विट करुन त्यांनी अमित शहा यांचे अभिनंदन सुद्धा केले आहे.
अमित शहा यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास त्यांना भाजपाचे अध्यक्ष पद सोडावे लागणार आहे. कारण, भाजपा 'एक व्यक्ति- एक पद' च्या सिद्धांतावर काम करत आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की, अमित शहा यांनी पार्टीचे अध्यक्ष पद सोडल्यास त्यांच्या जागी जेपी नड्डा किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पार्टीची धुरा सोपविली जाईल.
दरम्यान, अमित शहा यांनी भाजपाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर पार्टीमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याजागी कोणाला आणायचे, हे पार्टीसाठी मोठे अवघड काम आहे. अमित शहा भाजपाचे अध्यक्ष झाल्यानंतर पार्टीने सर्व स्तरावरील निवडणुकांमध्ये विजयाची मोहर उमटवली आहे. अमित शहांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या महानगरपालिका, विधानसभा निवडणुकांपासून लोकसभा निवडणुकांपर्यंत भाजपाने रेकॉर्डतोड प्रदर्शन केले आहे.