नवी दिल्ली : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच सर्वच राजकीय पक्ष आपापल्या विजयाचा दावा करत आहेत. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंजाबबाबत एनडीएचे व्हिजन स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, पंजाब हे सीमावर्ती राज्य असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे आणि तेथील सुरक्षेचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे.
ही निवडणूक पंजाबचे भवितव्य ठरवेल, असे जेपी नड्डा म्हणाले. ते म्हणाले की, पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेस एनडीएकडून 37 जागा लढवेल आणि 15 जागा सुखदेव सिंग ढिंढसा यांच्या शिरोमणी अकाली दलाला (संयुक्त) देण्यात आल्या आहेत. पंजाबमधील 65 जागांवर भाजपा निवडणूक लढवणार असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पंजाबसोबत विशेष नाते आहे आणि आता राज्याला आर्थिकदृष्ट्या यशस्वी करायचे आहे, त्यासाठी तेथे स्थिर सरकारची गरज आहे. पंजाबमध्ये देशविरोधी कारस्थाने होत आहेत, मात्र ही निवडणूक आगामी पिढ्यांना सुरक्षित ठेवणारी निवडणूक ठरेल. ही निवडणूक आणि पंजाब आमच्यासाठी खूप महत्त्वाची असून पंजाबमध्ये कायमस्वरूपी सरकार आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, असे जेपी नड्डा म्हणाले.
पंजाबच्या जनतेने देशासाठी खूप बलिदान दिले आहे, गुरू गोविंद सिंग यांचे बलिदान विसरता येणार नाही, गुरु तेग बहादूर यांचेही बलिदान कधीही विसरता येणार नाही, स्वातंत्र्यलढ्यातील भगतसिंग यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही. तसेच, मास्टर तारा सिंह यांनीही देशाला खूप काही दिले आहे, असे जेपी नड्डा यांनी सांगितले.
पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी रविवारी त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसच्या 22 उमेदवारांची नावे जाहीर केली. पटियाला शहरमधून कॅप्टन अमरिंदर सिंग निवडणूक लढवणार आहेत. 22 उमेदवारांपैकी 2 माढा, 3 दोआबा आणि 17 मालवा विभागातून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तसेच, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर केली जाईल. दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग पहिल्यांदाच काँग्रेस सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीत त्यांची भाजपाशी युती आहे. पक्षाने यावेळी नऊ जाट शीख, चार दलित, तीन ओबीसी, पाच हिंदू आणि एका महिलेला तिकीट दिले आहे.