नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्येभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेला केंद्र सरकारने गंभीरपणे घेतले असून राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत. याच दरम्यान नड्डा यांच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्याप्रकरणी आता कारवाई सुरू झाली आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून तीन एफआयआर नोंदवले गेले आहेत. तसेच पश्चिम बंगाल पोलिसांनी दगडफेकी प्रकरणी देखील अज्ञात लोकांविरोधात दोन एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय अन्य एक एफआयआर भाजपा नेता राकेश सिंह यांच्याविरोधातही नोंदवला गेला आहे. ज्यांच्यावर जमावाला भडकवण्याचा आरोप करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांच्या वाहन ताफ्याला झेड सुरक्षेशिवाय बंगाल पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा प्रदान केली होती. नड्डा यांचा ताफा जाणार त्या मार्गावर आणि कार्यक्रमस्थळी चार अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 8 पोलीस उपअधीक्षक, 8 पोलीस निरीक्षक, 30 पोलीस अधिकारी, 40 आरएएफ, 145 शिपाई, 350 सीव्हीचा बंदोबस्त होता. जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. याप्रकरणी गृहमंत्रालयाने राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडे पश्चिम बंगालची सद्यस्थिती व कायदा व सुव्यवस्थेविषयी सविस्तर अहवाल मागविला आहे.
कोलकाताजवळील दक्षिण 24 परगण्यात जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे नेते डायमंड हार्बरला जात असताना दुपारी बाराच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यास थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला. यावेळी टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली, असे ते म्हणाले. दरम्यान, घटनेनंतर केंद्राने हे कठोर पाऊल उचलले आहे. याप्रकरणी राज्यपालांसमवेत डीजीपी आणि मुख्य सचिवांकडूनही अहवाल मागविण्यात आला आहे, असे सुत्रांकडून समजते.
"जेपी नड्डांच्या ताफ्यावरचा हल्ला 'बनावट'"; TMC खासदार महुआ मोईत्रांचा दावा
नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यानंतर आता तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मात्र सोशल मीडियावर नड्डांवरील हा हल्ला बनावट असल्याचा दावा केला आहे. राज्यात दाखल होणारे नेते आपापल्या उच्च दर्जाची सुरक्षा यंत्रणा सोबत घेऊन येतात. मात्र तरीही नेत्यांवर हल्ला कसा होऊ शकतो असा सवालही मोईत्रा यांनी उपस्थित केला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतच एक ट्विट केलं आहे. "महाविद्यालयांच्या BYOB (ब्रिंग युअर ओन बॉटल) बद्दल ऐकलं होतं... भाजपा नेते पश्चिम बंगालमध्ये दररोज BYOS (ब्रिंग युअर ओन सिक्युरिटी) सोबत दाखल होतात. राज्यात दौऱ्यावर येणारा भाजपाचा कोणीही नेता आपल्यासोबत येताना सीआरपीएफ, सीआयएसएफ आणि केंद्रीय दलाच्या जवानांना घेऊन येतो. लज्जास्पद 'बनावट' हल्ल्यांपासून ते तुमची सुरक्षा करू शकले नाहीत" असं महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे.
'उठसूठ कोणीही बंगालमध्ये येतंय, चड्डा, नड्डा फाड्डा, गड्डा आलेत'; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल
ममता बॅनर्जी यांनी हे सगळं नाटक आहे. माध्यमाद्वांरे भाजपा नागरिकांना सभेपर्यंत आणू शकली नाही. यासाठीच हल्ल्याचा डाव रचला होता का? त्यांनी व्हिडीओ कसे काय तयार केले? बीएसएफ आणि सीआरपीएफची सुरक्षा असताना तुम्हाला कोणी हातही लावू शकेल का? असं ममता यांनी म्हटलं आहे. तसेच "देशाच्या गृहमंत्र्यांना काही काम नाही. उठसूठ पश्चिम बंगालमध्ये येतात. कधी कोण नेता तर कधी मंत्री येतात. आता चड्डा, नड्डा, फाड्डा, गड्डा आलेत. त्यांना राज्यात जनतेचं कुठलंही समर्थन नाही. यामुळे ते आपल्या कार्यकर्त्यांना नाटक करायला लावत आहे" असा हल्लाबोल ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केला आहे.