आम आदमी पक्षाचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर इटालिया यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोपाल इटालिया चर्चेत आले असून त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली होती. याच दरम्यान त्यांचा आता जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे, या व्हिडिओत ते नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह टीप्पणी करत असल्याचे दिसत आहे. यावरून आता भाजपानेआपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"आपचे नेते हिंदू देवदेवतांचा अपमान करतात, आता जनताचं यांची जोड्याने पूजा करेल" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी आपवर टीका केली आहे. "AAP गुजरात नेता गोपाल इटालिया पंतप्रधानांना नीच आणि त्यांच्या वयोवृद्ध आईला नौटंकीबाज म्हणतो. आपचे नेते हिंदुदेवदेवतांचा अपमान करतात. पावित्र्य मांगल्य मातृत्व देश परंपरा अशी एक तरी गोष्ट आहे का ज्याचे या अर्बन नक्षल्यांनी पोतेरे केले नाही. आता जनताचं यांची जोड्याने पूजा करेल" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गुजरात आम आदमी पार्टीचे (AAP) प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल इराणी यांनी इटालिया यांचा ‘गटर माऊथ’ असा उल्लेख केला. गोपाल इटालिया यांना जामीन मिळाला आहे. एक व्हिडिओ शेअर करताना स्मृती इराणी यांनी गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
“अरविंद केजरीवाल, गटरासारखं तोंड असलेल्या गोपाल इटालिया यांनी तुमच्या आशीर्वादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीरा बा यांच्याविरोधात अपशब्द काढले. मला कोणतीही नाराजी व्यक्त करायची नाही, गुजराती किती नाराज आहेत हेही दाखवायचं नाही. परंतु तुम्हाला जनतेने पाहिलंय हे जाणून घ्या. गुजरात निवडणुकीत तुमचा पक्ष नष्ट होईल,” असे इराणी म्हणाल्या.