दिल्लीत फोडाफोडीचं राजकारण; आप, काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपाच्या संपर्कात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:45 AM2019-05-21T11:45:33+5:302019-05-21T11:46:18+5:30
काँग्रेसचे दिल्लीतील काही नेते, आमदार, आम आदमी पक्षाचे आमदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे.
नवी दिल्ली - एक्झिट पोलच्या दिलासा देणाऱ्या आकडेवारीनंतर दिल्लीभाजपा नेत्यांची नजर फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लागली आहे. गुरुवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर दिल्ली भाजपा कार्यकारणीने पक्षाच्या बाजून वातावरण निर्मिती करण्याची तयारी केली आहे. जास्तीत जास्त आपच्या आमदारांवर लक्ष ठेवून त्यांना भाजपात समाविष्ट करुन घेण्याचा प्रयत्न नेत्यांनी सुरु केला आहे.
काँग्रेसचे दिल्लीतील काही नेते, आमदार, आम आदमी पक्षाचे आमदार यांच्यावर भाजपाची नजर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीतील फोडाफोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. आम आदमी पक्षाचे जवळपास एक डझनभर आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. निवडणुकीच्या दरम्यानही आपच्या काही आमदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. पुढील 10 ते 15 दिवसांत काँग्रेसचे माजी मंत्री आणि आपचे आमदार भाजपात प्रवेश करतील असं भाजपाच्या सूत्रांनी सांगितले आहे.
भाजपा सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आपच्या कमीत कमी 5 आमदारांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधून भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र प्रवेश करणाऱ्या आमदारांपैकी प्रत्येकाची येणाऱ्या विधानसभेत भाजपाने उमेदवारीचं तिकीट द्यावं ही अट अडचणीची ठरणार आहे. आश्वासन देऊन कोणाला पक्षात घेण्याची पक्षाची इच्छा नाही मात्र राजकीय समीकरण पाहून पार्टीचे नेतृत्त्व तिकीट देण्याचा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जातंय.
भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणं आहे की, आपच्या आमदारांना पक्षात प्रवेश देऊन भाजपाची तिकीट देण्यास काही हरकत नाही मात्र जर कोणी आम्हाला तिकीट द्याल तर पक्षात प्रवेश करु ही अट ठेवली तर ही अट पक्ष नेतृत्त्व मान्य करणार नाही. कारण भाजपाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दुखविण्यास पक्षाने नकार दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दिल्ली राज्यातील राजकारणालाही वेग येईल अस चित्र सध्या दिसतंय. दिल्लीत लोकसभेच्या एकूण 7 जागा आहे. मागील निवडणुकीत या सातही जागा जिंकण्यात भाजपाला यश आलं होतं. त्यामुळे यंदा दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतात हे पाहणे गरजेचे आहे.