2024 मध्येही भाजप सत्तेत असणार का? शशी थरूर यांनी मोठ्या विजयाचे केले भाकीत,पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:43 AM2023-01-14T09:43:44+5:302023-01-14T09:43:54+5:30
2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे.
2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी सर्वपक्षीयांनी तयारी सुरू केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी भारतीय जनता पक्षही संघटनेपासून सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी 2024 मध्ये फक्त भाजपचेच सरकार स्थापन होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2019 च्या तुलनेत जागा जिंकणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी शुक्रवारी केला. या तुलनेत भाजपच्या 50 जागा कमी होऊ शकतात, असंही थरुर म्हणाले.
शशी थरूर यांच्या दाव्यानुसार,2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील. एनडीएच्या मित्रपक्षांसोबत सरकार स्थापन करणे त्यांच्यासाठी अवघड काम असणार नाही. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला केवळ 272 जागांची गरज आहे.
काल खासदार शशी थरुर यांनी अनंतपुरम येथे एका कार्यक्रमात हे वक्तव्य केले. '2019 मध्ये भाजपने चांगली कामगिरी केली होती. हरियाणा, गुजरात, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र येथे त्यांनी चमकदार कामगिरी केली होती. पश्चिम बंगाललाही 18 जागा मिळाल्या. आता त्या सर्व निकालांची प्रतिकृती करणे अशक्य आहे. 2024 मध्ये बहुमतापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे, असंही थरुर म्हणाले.
पुलवामा आणि बालाकोट हल्ल्याचा संदर्भ देत शशी थरूर म्हणाले की, शेवटच्या क्षणी सरकारच्या बाजूने जबरदस्त लाट आली होती. 2024 मध्ये त्याची पुनरावृत्ती होणे शक्य नाही. विरोधी पक्षांना संधी मिळू शकते.
"जर भाजप 250 जागांवर थांबला, तर इतरांना 290 जागा मिळतील. भाजप वगळता इतर पक्ष 290 जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील की नाही हे आम्हाला माहित नाही." 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 543 पैकी 303 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला फक्त 52 जागा जिंकता आल्या, असंही शशी थरुर म्हणाले.