देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. दोन दिवसांवर मतदान आले आहे. देशात प्रादेशिक पक्षांसोबत काँग्रेस-भाजपा हे एकमेकांच्या विरोधात आहेत. कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसना भर लोकसभेत धु धु धुतले आहे. असे असताना आज दुसऱ्याच दिवशी मेघालयमध्ये काँग्रेस आणि भाजपा हे दोन पक्ष एकाच आघाडीत आले आहेत.
राजकारणात काहीही होऊ शकते, मान्य. परंतू ते स्थानिक पातळीवर ठीक आहे, राज्याच्या सरकारमध्ये कसे चालेल. परंतू मेघालयात हे झाले आहे. मेघालयात काँग्रेसचे पाच आमदार मंगळवारी भाजपाप्रणित मेघालय जनतांत्रिक आघाडीत सहभागी झाले आहेत. गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्यासह १२ आमदार काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते. यानंतर मेघालय विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या पाच झाली होती. सुरुवातीला विरोधी पक्षात १७ सदस्य होते. आता फक्त तृणमूलचे आमदारच विरोधी पक्षात उरले आहेत.
काँग्रेसच्या आमदारांनी अधिकृतरित्या मुख्यमंत्री कोनराड संगमा यांना समर्थनाचे पत्र दिले आहे. यानंतर या आमदारांना भाजपाच्या आघाडीत सहभागी करण्यात आले. सरकारचे हात आणि निर्णय आणखी मजबूत करण्यासाठी एमडीएला समर्थन देत असल्याचे या आमदारांनी या पत्रात म्हटले आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रमुख आणि मुख्यमंत्री कोनराड संगमा म्हणाले की, ज्या काँग्रेस आमदारांनी अधिकृतपणे एमडीए सरकारला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे त्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. जनता आणि राज्याच्या हितासाठी सरकार मजबूत करण्यासाठी आम्ही एमडीएच्या बॅनरखाली एकत्र काम करू.