नवी दिल्ली: केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीचे नाव बदलले आहे. आता याला पंतप्रधान मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी म्हणून ओळखले जाईल. नेहरू स्मारकाच्या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे.
नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या विशेष बैठकीचे अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंह होते, जे सोसायटीचे उपाध्यक्ष आहेत.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सर्व पंतप्रधानांना समर्पित असलेले एक संग्रहालय तीन मूर्ती संकुलात उभारण्याची कल्पना मांडली होती. NMML च्या कार्यकारी परिषदेने 25 नोव्हेंबर 2016 रोजी 162 व्या बैठकीत याला मान्यता दिली. आता हा प्रकल्प पूर्ण झाला असून 21 एप्रिल 2022 रोजी पंतप्रधानांचे संग्रहालय लोकांसाठी खुले करण्यात आले.
नाव का बदलले?कार्यकारी परिषदेला वाटले की, संस्थेचे नाव स्वतंत्र भारतात राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान दर्शविणारे असावे. दरम्यान, यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, मोदी हे संकुचित वृत्ती आणि सूडबुद्धीचे दुसरे नाव आहे. 59 वर्षांहून अधिक काळ, नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी हे ऐतिहासिक स्थळ आणि पुस्तकांचा खजिना आहे. याला पंतप्रधान संग्रहालय आणि सोसायटी म्हटले जाईल. पंतप्रधान मोदी भारताच्या शिल्पकाराचे नाव आणि वारसा बदनाम करण्याचे, अपमानित करण्याचे आणि नष्ट करण्याचे काम करत आहेत. स्वतःच्या असुरक्षिततेच्या ओझ्याखाली दबलेला एक छोटा माणूस स्वयंघोषित विश्वगुरू म्हणून फिरत असतो, अशी टीका त्यांनी केली.