मुंबई: वाढत्या इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करणाऱ्या काँग्रेसनं आता सोशल मीडियावरदेखील सरकारला घेरण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या देशव्यापी बंदनंतर भाजपानं ट्विटरवर पेट्रोल, डिझेल दरवाढीबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली. काँग्रेसच्या काळात इंधन दरात होत असलेली दरवाढ जास्त होती, असं सांगण्याचा प्रयत्न भाजपानं केला. मात्र काँग्रेसनं आंतरराष्ट्रीय बाजारातील आधीच्या आणि आताच्या दरांची तुलना करत भाजपाला आरसा दाखवला. 16 मे 2009 ते 16 मे 2014 या कालावधीत म्हणजेच यूपीए-2 च्या काळात पेट्रोलचे दर 75.8 टक्क्यांनी वाढ झाली होती, असं भाजपानं ट्विटमधील आकडेवारीच्या माध्यमातून म्हटलं आहे. यूपीए-2 च्या काळात पेट्रोलचे दर 40.62 रुपयांवरुन 71.41 रुपयांवर पोहोचले होते. मात्र भाजपा सत्तेत आल्यावर पेट्रोलचे दर केवळ 13 टक्क्यांनी वाढले आहेत. पेट्रोलचा दर 71.41 रुपयांवरुन 80.73 रुपयांवर गेले आहेत, असं सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ही आकडेवारी दिल्लीतील पेट्रोलशी संबंधित आहे. भाजपाच्या या आकडेवारीला काँग्रेसनं आकड्यांच्याच मदतीनं उत्तर दिलं आहे. 16 मे 2009 ते 16 मे 2014 या कालावधीत पेट्रोलचे दर 40.62 रुपयांवरुन 71.41 रुपयांवर पोहोचले. मात्र या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 84 टक्क्यांनी वाढले होते, हे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसनं आकडेवारीच्या माध्यमातून केला आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाच्या दरात 34 टक्क्यांनी कमी झाले. काँग्रेसच्या काळात 107 डॉलर प्रति बॅरल असलेल्या कच्च्या तेलाचे दर आता 71 डॉलरपर्यंत खाली आले आहेत. मात्र तरीही पेट्रोलचा दर 71 रुपयांवरुन 80 रुपयांवर गेला आहे, असं काँग्रेसनं ट्विटमधील आकडेवारीतून म्हटलं आहे.