नवी दिल्ली - भारतीय सैन्यदलाकडून कुठलेही नवे अस्त्रशस्त्र खरेदी केल्यानंतर किंवा कुठल्याही मोठ्या सरकारी प्रकल्पाचे भूमीपूजन करताना नारळ, फुले वाहणे, पूजापाठ करणे काही नवी बाब नाही. मात्र फ्रान्सकडून राफेल विमान ताब्यात घेताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या विमानाच्या पुजनावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. राजनाथ सिंह यांनी राफेल विमानावर ओम काढत नारळ ठेवून विमानाची पूजा हा तमाशा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्याला आता भाजपाने प्रत्युत्तर देत काँग्रेस पक्ष भारतीय परंपरा आणि रीतीरिवाजांच्या विरोधी असल्याचा आरोप केला आहे. तसेच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जहाजाचे जलावतरण करताना पूजा करत असतानाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेहरू हे नारळ वाढवून जहाजाचे जलावतरण करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ सय्यद अतहर देहलवी यांनी 14 मार्च 2018 रोजी ट्विट केला होता. 14 मार्च 1948 रोजी पंडित नेहरू यांनी स्वतंत्र भारतातील पहिले जहाज जल ऊषाचे जलावतरण वैदिक मंत्रोच्चार आणि विधिवत पूजा करून केले होते, असा दावा या व्हिडिओमधून करण्यात आला आहे. दरम्यान, राफेल विमानाच्या पूजेवरून वाद निर्माण झाल्यानंतर सय्यद अतहर देहलवी यांनी हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर केला आहे. तसेच राजनाथ सिंह यांनी फ्रान्समध्ये जे काही केले. त्यात नवीन असे काहीच नाही, असा दावा केला आहे.
राफेलच्या पूजनावरून भाजपा-काँग्रेस आमनेसामने, पंडित नेहरूंचाही पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 10:04 AM