राजस्थान : सिकर आणि झुनझुनू हे राजस्थानमधील दोन मतदारसंघ. या जिल्ह्यांच्या गावांमधील जवळपास प्रत्येक घरातील एक तरुण लष्कर वा केंद्रीय सुरक्षा दलाच्या सेवेत आहे. सैन्य दलाचा प्रचारात उल्लेख करू नये, असे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना बजावले असले तरी भाजप, कॉँग्रेसला त्याचे सोयरसुतक दिसत नाही. येथे हुतात्म्यांचे राजकारण केले जात आहे. भाजप हौतात्म्याचा प्रचार करत आहे, तर कॉँग्रेस काही उणिवा समोर आणत आहे.
सीआरपीएफ व बीएसएफमध्ये ज्यांचे नातेवाईक सेवेत आहेत, त्या कुटुंबीयांच्या काँग्रेस कार्यकर्ते भेट घेत आहेत. लष्करातील जवानांना जो शहिदांचा दर्जा दिला जातो, तो सशस्त्र दलातील मृत जवानांना मिळत नाही, असे सांगून काँग्रेस कार्यकर्ते या भेदभावाची माहिती त्यांना देत आहेत. भाजप व मोदी सरकारविरोधासाठी त्याचा उपयोग केला जात आहे. भाजपचे कार्यकर्ते जवानांच्या हौतात्म्यानंतर भरपाईची तरतूद केवळ मोदी सरकारने केली, शहिदांच्या मुलांना विनामूल्य शिक्षणाची तरतूद केली, असे सांगत आहेत. पाकवर केलेला हवाई हल्ला हे वीरत्वाचे लक्षण आहे, हे सांगून ‘वन रँक वन पेन्शन’ आम्हीच लागू केल्याचा प्रचार भाजप करीत आहे.
लष्कराच्या कामगिरीचे श्रेयझुनझुनू विभागाचे कॉँग्रेस अध्यक्ष जितेंद्र सिंग म्हणाले की, लष्कराच्या कामगिरीचे श्रेय भाजप घेऊ पाहत आहे. येथील जवळपास प्रत्येक घरातील एक जण संरक्षण दलाच्या सेवेत आहे. राष्ट्रवाद व देशभक्तीसाठी त्याग म्हणजे काय हे आम्ही दाखवून दिले आहे. त्याचे राजकारण केले जाऊ नये.