पूनावाला प्रकरण भाजपाचे षड्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 04:32 AM2017-12-02T04:32:58+5:302017-12-02T04:33:04+5:30
माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी काँग्रेस पक्षाबाबत प्रोप्रायटरशिपचा (मालकी) उल्लेख केल्यानंतर यावरून राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणाला भाजप राजकीय रंग देऊन गुजरातच्या राजकीय वातावरणाला नवी दिशा देण्याच्या प्रयत्नात आहे.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी काँग्रेस पक्षाबाबत प्रोप्रायटरशिपचा (मालकी) उल्लेख केल्यानंतर यावरून राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणाला भाजप राजकीय रंग देऊन गुजरातच्या राजकीय वातावरणाला नवी दिशा देण्याच्या प्रयत्नात आहे. कारण, मनीष तिवारी आणि शहजाद पूनावाला यांच्यात झालेल्या चर्चेत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा उल्लेख आहे. दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्षपदासाठी एकमेव दावेदार आहेत. राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यासाठीच हे षड्यंत्र रचले असून, यात पूनावाला यांना मोहरा बनविले असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला यांनी या ‘स्टिंग’नुसार मनीष तिवारी यांना शुक्रवारी सायंकाळी फोन केला आणि आपली व्यथा मांडत तिवारी यांचे समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. पूनावाला यांनी ही चर्चा मोबाइलवर टेप केली. त्यानंतर एका इंग्रजी टीव्ही चॅनलकडे सोपविली. या दीर्घ चर्चेत तिवारी हे फिरकी घेत ‘प्रोप्रायटरशिप’बाबत बोलले. याचसाठी पूनावाला हे तिवारी यांना उद्युक्त करीत होते.