ईडीच्या नोटीसांना फक्त उत्तर पाठवत चौकशीला गरहजर राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपानेआपच्या सात आमदारांशी संपर्क साधला असून त्यांना फोडण्यासाठी पैसे, भीती आणि निवडणुकीच्या तिकीटाचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.
अलीकडेच त्यांनी आमच्या दिल्लीतील 7 आमदारांशी संपर्क साधला आहे, असे केजरीवाल म्हणाले. आम्ही केजरीवाल यांना काही दिवसांनी अटक करू. त्यानंतर आमदार फोडू. 21 आमदारांशी चर्चा झाली आहे. इतरांशीही बोलतो आहोत. त्यानंतर दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडू. तुम्ही पण येऊ शकता. २५ कोटी देणार आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, असे या आमदारांना भाजपाकडून सांगण्यात आल्याचे केजरीवाल म्हणाले.
भाजपाने 21 आमदारांशी संपर्क साधल्याचा दावा केला असला तरी आमच्या माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत फक्त 7 आमदारांशी संपर्क साधला आहे. या सर्वांनी भाजपाच्या या ऑफरला नकार दिला आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
याचा अर्थ कोणत्याही दारू घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी मला अटक केली जात नसून दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार पाडण्याचा त्यांचा डाव आहे. गेल्या नऊ वर्षांत त्यांनी आमचे सरकार पाडण्यासाठी अनेक कट रचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. देव आणि लोकांनी आम्हाला नेहमीच साथ दिली. आमचे सर्व आमदारही भक्कमपणे एकत्र आहेत. यामुळे यावेळी देखील हे कारस्थानी लोक त्यांच्या नापाक हेतूंमध्ये फसतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
विरोधकांनी निर्माण केलेल्या सर्व अडथळ्यांना न जुमानता आम्ही खूप काही साध्य केले आहे. दिल्लीतील जनतेसाठी किती काम केले हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे निवडणुकीत 'आप'चा पराभव करणे त्यांना पेलवणारे नाही. त्यामुळे त्यांना बनावट दारू घोटाळ्याच्या निमित्ताने अटक करून सरकार पाडायचे आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला.