भाजपाच्या १४ नगरसेवकांचे राजीनामे नाराजी: आमदार भोळेंच्या सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2016 6:25 PM
जळगाव : महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या १४ नगरसेवकांनी महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले.
जळगाव : महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या १४ नगरसेवकांनी महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. शनिवारी दुपारी भाजपाचे मनपातील नगरसेवक विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले होते. यानंतर पक्षाच्या कार्यालयात जाऊन तेथे महानगर जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांना एक निवेदन देण्यात येऊन आपले राजीनामे सादर करण्यात आले. या पत्रात म्हटले आहे की, पक्षाचे नेते, आमचे श्रद्धास्थान एकनाथराव खडसे यांच्यावर काही दिवसांपासून बिनबुडाचे आरोप होत आहेत. या स्थितीने पक्षाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणे अपेक्षित होते. या आरोपांमुळेच खडसे यांना राजीनामा देणे भाग पडले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या निषेधार्थ आम्ही आमच्या नगरसेवक पदाचे राजीनामे देत आहोत. यांनी दिले राजीनामेविरोधी पक्षनेते वामनराव खडके, सुनील माळी, विजयकुमार गेही, अनिल देशमुख, सीमा भोळे, उज्ज्वला बेंडाळे, रवींद्र पाटील, ज्योती चव्हाण, जयश्री पाटील, पृथ्वीराज सोनवणे, कंचन बालाणी, उज्ज्वला बाविस्कर, दीपमाला काळे, संजय राणे आदी १४ नगरसेवकांच्या या पत्रावर स्वाक्षर्या आहेत. मनपातील गटनेते अश्विन सोनवणे हे बाहेर गावी असल्यामुळे व सुचिता हाडा यांच्या मुलांची तब्बेत ठीक नसल्याने त्यांच्या या पत्रावर स्वाक्षर्या नसल्याचे माजी स्थायी समिती सभापती उज्ज्वला चव्हाण यांनी सांगितले.