Devendra Fadnavis In Ayodhya: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर आहेत. भाजपचे अनेक आमदार शिंदे गटासह अयोध्येला गेले आहेत. यातच अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत पोहोचल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे. लखनऊ विमानतळावर पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या भूमीशी माझे नाते आहे. या ठिकाणच्या अनेक आठवणी आहेत. रामलल्लाचे दर्शन घेण्याची इच्छा होती म्हणून आलो. खूप दिवसाची इच्छा होती. आमच्या सेंट्रल इलेक्शन कमिटीची मिटिंगही होती. तरी असा विचार केला की दर्शन घेऊन मग दिल्ली जाऊया, असे स्पष्ट करत, राम जन्मभूमीच्या आंदोलनाशी जोडलेलो होतो. प्रत्येक कारसेवेला हजर होतो. या भूमीशी माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. मनापासून आनंद होतोय की या ठिकाणी येता आले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचे दर्शन घेतले पाहिजे
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अयोध्या दौऱ्यावरून टीका केली होती. यावर बोलताना, त्यांचे कामच टीका करणे आहे. त्यांना कदाचित आस्था नसेल. आम्हाला आस्था आहे. राज्यकारभार कसा असावा हे प्रभू श्रीरामाने सांगितले आहे. गांधींजींची संकल्पना रामराज्याची होती. रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचे दर्शन घेतले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच आम्हाला सावरकरांचे हिंदुत्व मान्य आहे. शेवटी भारतात बहुसंख्य हिंदू राहतात. तुम्ही त्याला हिंदू राष्ट्र म्हणा की म्हणू नका हे हिंदूराष्ट्र आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.
दरम्यान, शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपची युती १०० टक्के नैसर्गिक युती आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना पाहायला मिळत आहे. वारसा जन्माने नाही तर कर्माने मिळतो हे शिंदे यांनी दाखवून दिले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ३५ वर्ष शरद पवार साहेब काँग्रेस सोबत आहे. ज्या खालच्या स्तरावर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांचा उल्लेख केला आहे. ते योग्य नाही एवढेच मी सांगितले, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"