Devendra Fadnavis In Karnataka: १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे. भाजप, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे बडे नेते कर्नाटकात जोरदार प्रचार करत आहेत. महाराष्ट्रातील अनेक नेते कर्नाटकात जाऊन प्रचार करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकात प्रचारसभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे, कर्नाटकात काय करणार, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.
सीमाभागातील निपाणीमध्ये जाहीर सभेत बोलताना, इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलगीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो. काँग्रेसला आता राहिलेच नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शशिकला जोल्ले निवडून आल्याचे जाहीर करतो
शशिकला जोल्ले वहिनी कर्नाटकात सगळ्यात जास्त लीडने निवडून येणार आहेत. सभेला झालेली गर्दी पाहिली असता वहिनी निवडून आल्या, असे जाहीर करतो. या निवडणुकीत तुमच्या भाग्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे. माता भगिनींच्या नावाने घर केले जाणार आहे. पुरुषांच्या नावात घर असणार नाही. माफ करा पुरुषांनो, ते कधी विकून टाकतील याचा नेम नाही, पण भगिनी तसे करत नाहीत. मोदींनी दिलेल्या लसीमुळे आज सगळे जिवंत आहोत, पाकिस्तानचा नेता कटोरा घेऊन निघाला आहे, पण कोणी त्यांना मदत करत नाहीत. पाकिस्तानात किती महागाई आहे याची कल्पना तुम्हाला आहे का? मात्र, आपली अर्थव्यवस्था गतीने पुढे जात आहे. या मतदारसंघात काही लोक जातीयवादीपणा करत आहेत. काँग्रेसचे तर डोके फिरल आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस सीमावर्ती भागामध्ये भाजप उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत. फडणवीस यांचे बेळगावात आगमन झाल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवून धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या होत्या.