नवी दिल्ली-
दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर उत्तर दिल्ली महापालिकेकडून आरोपींच्या बेकायदेशीर मालमत्तांवर बुलडोजर चालवण्यास सुरुवात केली आहे. आज सकाळपासून जहांगीरपुरी परिसरातील अवैध बांधकामांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. यात अनेक घरांवर बुलडोझर चालवण्यात आला. पालिकेच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात आली होती आणि कारवाईला सुरुवात होताच कोर्टानं तातडीनं सुनावणी करत कारवाईवर स्थगितीचे आदेश दिले आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जहांगीरपुरीमधील कारवाईवरुन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपानं देशातील गरीबांविरोधात युद्धाची घोषणा केली आहे, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.
दिल्लीच्या जहांगीरपुरी येथील कारवाईचा निषेध व्यक्त करताना ओवेसी यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. "अवैध बांधकामाच्या नावाखाली भाजपानं गरीबांविरोधात युद्धाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारखंच आता दिल्लीतही गरीबांची घरं उद्ध्वस्त केली जात आहेत. तेही कोणतीही नोटीस न देता. सर्वसामान्यांना कोर्टात जाण्याचीही संधी दिली जात नाही. फक्त गरीब मुस्लीमांनाच लक्ष्य केलं जात आहे", असं ट्विट ओवेसी यांनी केलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रश्नावर आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही ओवेसी यांनी केली आहे. त्यांच्या सरकारचं पीडब्ल्यूडी खातं देखील या विध्वंस मोहिमेचा भाग आहे का, असा सवाल त्यांनी केला. "जहांगीरपुरीमधील लोकांनी असा विश्वासघात आणि भ्याडपणासाठी त्यांना मतदान केलं होतं का?, पोलीस आमच्या नियंत्रणाखाली नाहीत असं वारंवार कारण देऊन चालणार नाही. आता कायदेशीरपणा किंवा नैतिकतेचा ढोंगही त्यांना करता येणार नाही. सध्या दिल्लीत निराशाजनक परिस्थिती आहे", असं ओवेसी म्हणाले.