नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थित दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयात हा ज्योतिरादित्य शिंदे यांचा पक्षप्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशानंतर काही तासांत भाजपाने मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच मध्य प्रदेशातील भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या मध्य प्रदेशातील 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठविला आहे. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले असून कोसळण्याच्या स्थितीत आहे.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांचे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आभार मानले. "माझ्या आयुष्यात 2 तारखांना अतिशय महत्त्व आहे, 30 सप्टेंबर 2001 रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले. या दिवसामुळे माझे आयुष्य बदलले. तर, दुसरी तारीख 10 मार्च 2020 जी वडिलांची 75 वी जयंती आहे. ज्यादिवशी मी एक मोठा निर्णय घेतला आहे. राजकारण करत असताना, भारत मातेची सेवा करणे हेच उद्देश असायला हवे, तर राजकारण हा त्याच्या उद्देशपूर्तीचा मार्ग असावा", असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
याशिवाय, माझ्या वडिलांनी मध्य प्रदेश आणि देशाची सेवा केली. मी काँग्रेस पक्षातून आता भाजपात काम सुरू करत आहे, असे म्हणत काँग्रेसबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, काँग्रेस पहिल्यासारखी राहिली नाही. सध्या, जनसेवेचा उद्देश काँग्रेस संघटनेतून पूर्ण होत नाही, असे म्हणत काँग्रेस नेतृत्वावर ज्योतिरादित्य शिंदे यांनी टीका केली.
दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये डिसेंबर 2018 पासून काँग्रेसचे सरकार आहे. मात्र सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळत होती. ज्योतिरादित्य शिंदे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असूनही त्यांना बाजूला सारण्यात आले. यानंतर त्यांना प्रदेशाध्यक्षपदही देण्यात आले नाही. त्यामुळे आपल्याला किमान राज्यसभेत पाठविण्यात यावे अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, राज्यातल्या दोन जागांसाठी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी जोर लावत पुन्हा एकदा ज्योतिरादित्य शिंदे यांना साईडलाईन केले. काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढला होता. तेव्हापासूनच ते काँग्रेसपासून दूर जातील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.