नवी दिल्ली - झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपच्या या पराभवामुळे बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मित्र असलेले नितीश कुमार आनंदी होणार असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये सत्तेत असूनही नितीश यांच्यासाठी भाजपचा झारखंडमधील पराभव सुखावणारा आहे.
झारखंडमधील पराभवामुळे यापुढे भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सामोचराने घेईल, असं त्यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांना योग्य तो सन्मान भाजपकडून देण्यात आला नाही. भाजपला एकट्याच्या बळावर देशात बहुमत मिळाल्याने हे झाल्याचा मतप्रवाह आहे. त्यावेळी नितीश यांनी केंद्रात महत्त्वाचे मंत्रीपद मागितले होते. त्यांची ही मागणी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुडकावून लावली होती. तसेच पटना येथील विश्वविद्यालयाला केंद्रीय विश्वविद्यालय बनविण्याची नितीश यांची मागणी फेटाळून लावली होती.
दरम्यान झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे. झारखंडमध्ये भाजपचा पराभव होण्याचे अनेक कारणं आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपकडून झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी गैरआदिवासी असलेले रघुबर दास यांना बसविण्यात आले होते. त्यावेळी विरोधात असलेल्या नितीश यांनी भाजपच्या या निर्णयाला विरोध केला होता. तसेच आदिवासींच्या राज्यात हा आदिवासींवर अन्याय असल्याचे म्हटले होते.