नवी दिल्ली: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवरमध्ये नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची पायाभरणी केली. मात्र, भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी यासंदर्भात ट्विटरवर चीनच्या बिजिंगमधील दॅक्सिन इंटरनॅशनल एअरपोर्टचे फोटो शेअर केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेला काहीच दिवस होत असताना भाजपची पुन्हा एक चूक समोर आली आहे. दिल्लीतील अशाच एका कार्यक्रमातील पोस्टरवरून नवा वाद निर्माण झाला आहे. कारण या पोस्टरमध्ये झोपडपट्टीमधील रहिवासी म्हणून चक्क तामिळ साहित्यिक पेरुमल मुरुगन यांचा फोटो लावण्यात आला आहे.
झोपडपट्टीमधील रहिवासी लेखक, साहित्यिक पेरुमल मुरुगन यांचा फोटो लावल्याची बाब समोर आल्यावर भाजपकडून सारवासारवीची उत्तरे देण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत भाजपकडून झुग्गी सम्मान यात्रा अर्थात झोपडपट्टी सन्मान यात्रा नावाचा एक उपक्रम राबवला जात आहे. दिल्ली महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रचार मोहीम राबवली जात असून, या पार्श्वभूमीवर छापण्यात आलेल्या पोस्टर्सवर तामिळ लेखक पेरुमल मुरुगन यांचा फोटो झोपडपट्टी रहिवासी म्हणून छापण्यात आला आहे.
पेरुमल मुरुगन यांनी दिली प्रतिक्रिया
पेरुमल मुरुगन हे नावाजलेले तामिळ साहित्यिक आहेत. त्यांनी आजपर्यंत १० कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा, तसेच कविता लिहिल्या आहेत. दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या कार्यक्रमात मुरुगन यांचा फोटो लावलेले पोस्टर झळकल्यानंतर यावर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. यासंदर्भात विचारणा केली असता पेरुमल मुरुगन यांनी संयमी प्रतिक्रिया दिली आहे. मी स्वत: झोपडपट्टीमध्ये राहिलो आहे. त्यामुळे माझा फोटो त्यांच्यासोबत झळकल्यामुळे मला आनंदच झाला आहे, असे पेरुमल मुरुगन यांनी म्हटले आहे. ते इंडियन एक्स्प्रेसशी बोलत होते. दरम्यान, दिल्ली भाजपकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.