Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. विशेष करून ठाकरे गटाकडून भाजपावर सडकून टीका केली जात आहे. यावरून भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला असून, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
काही दिवसांपूर्वी एका सभेला संबोधित करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही एका सभेत बोलताना संजय राऊतांनी केलेल्या विधानाला एकप्रकारे पाठिंबा दर्शवत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला होता. याप्रकरणी भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे भाजपाने म्हटले आहे.
संजय राऊतांवर FIR दाखल करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि गुजरातच्या नागरिकांची बिनशर्त माफी मागावी. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी भाजपाने केली आहे. यासंदर्भात भाजपाने निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले असून, याची दखल घेण्याची विनंती केली आहे.
दरम्यान, महायुतीचे जागावाटप लवकरच निश्चित होऊन उमेदवारी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. यातच ठाकरे गटाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. संजय राऊतांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.