संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने शेवटच्या तीन टप्प्यात लोकसभेच्या १६३ जागांवर दिग्गज नेत्यांची नियुक्ती करून जागा जिंकण्याची जबाबदारी दिली आहे. या सर्व जागांवर जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून नेत्यांना तैनात केले आहे.
अंतिम तीन टप्प्यांतील सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. निवडणुका झालेल्या १८ राज्यांतील नेत्यांना उर्वरित जागांवर पाठविले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव, भजनलाल शर्मा, हेमंत बिस्वा सरमा, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकच्या नेत्यांना या जागाी तैनात केले आहे.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरही जबाबदारी
भाजपने अमेठी आणि रायबरेलीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचे मास्टर नेते पाठवले आहेत. केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांना मायक्रो मॅनेजमेंटसाठी अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाठविले आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही अमेठी-रायबरेलीमध्ये अधिक वेळ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेठीमध्ये ओबीसी आणि मौर्य यांची संख्या मोठी आहे. रायबरेली आणि अमेठीच्या ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना पाठविण्यात आले आहे. रायबरेलीत ब्राह्मण मोठ्या संख्येने आहेत आणि राजपूतही मोठ्या संख्येने आहेत.