चंदीगड महापालिकेचा महापौर निवडणुकीचा वाद फार गाजला होता. महापौर निवडणुकीत निवडणूक अधिकारीच मते बाद करताना आढळला होता. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल फिरवत आपच्या उमेदवाराला विजयी घोषित केले होते. परंतु वरिष्ठ आणि कनिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
भाजपच्या उमेदवाराला 19 मते मिळाली, तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे संयुक्त उमेदवार गुरप्रीत गबी यांच्या बाजूने 17 मते पडली. तर एक मत अवैध ठरविण्यात आले. यावरून आप आणि काँग्रेसने मतपत्रिकांमध्ये छेडछाड केल्याचे आरोप केले आहेत.
चंदीगड महापालिकेत एकूण 35 नगरसेवक आहेत, तर एका खासदाराच्या मतामुळे ही मते 36 होतात. बहुमताचा आकडा 19 होता. तीन नगरसेवकांनी पक्षांतर करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या मतांची संख्या 20 वरून 17 वर आली होती.
फेब्रुवारी महिन्यात चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध घोषित केलेली सर्व 8 मते वैध ठरवून आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांना विजयी घोषित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच वरिष्ठ आणि कनिष्ठ उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे आदेश दिले होते.