नवी दिल्ली: मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरून एकीकडे नवाब मलिक एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत असून, दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेत्यांची खंडणीखोर अधिकाऱ्यासाठी वकिली सुरू असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला असून, संजय राऊत ड्रग्जवाल्यांची वकिली करत आहेत का, अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राला ज्याप्रमाणे ड्रग्जचा विळखा पडला आहे, तरुणाई बर्बाद होतेय, त्याविरुद्ध लढायच्या ऐवजी संजय राऊतांसारखे लोकं त्यांना समर्थन देत असतील, तर आपण म्हणतो ना की, ईश्वरच मालक आहे, अशीच परिस्थिती निर्माण होईल. परंतु, मला त्यांना उत्तर द्यायची इच्छा नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे आहे. संजय राऊत यांचा उद्देश एवढाच आहे की, मूळ मुद्द्यांपासून सगळ्या गोष्टी, सगळे लक्ष भटकले पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
संजय राऊत शेतकऱ्यांबद्दल कधीही चकार शब्द बोलत नाहीत
संजय राऊत शेतकऱ्यांबद्दल कधीही चकार शब्द बोलत नाहीत. मराठवाड्यात इतका भयानक पाऊस झाला. शेतकऱ्यांची अवस्था एवढी बिकट झाली. त्यांना एक नवा पैसा मिळालेला नाही. त्याहीबद्दल ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना काय उत्तर द्यावे, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
तुमच्याजवळ असलेले पुरावे न्यायालयात सादर करावे
नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीका करत असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलतान, कुठल्याही तपास अधिकाऱ्याला वैयक्तिकरित्या टार्गेट करणे हे योग्य नाही. तुमच्याकडे जे काही पुरावे आहेत, ते न्यायालयात सादर करा. यासंदर्भात न्यायालयात केस सुरू आहे. संविधानिक पदावर असलेली व्यक्ती बाहेर बोलते मात्र न्यायालयात पुरावे देत नाही, हे चुकीचे आहे. फिर्यादी पक्षाची विश्वासार्हता कमी करण्याचे काम सरकारी तंत्राने व्हायला लागले, तर यापुढे कुठलीच केस कुठेही टिकणार नाही आणि एक नवीन चुकीची पद्धत तयार होईल. त्यामुळे नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयाला दिले पाहिजेत. दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नीने सर्व पुरावे दिले आहेत. मात्र, मलिकांचा ग्रिव्हियन्स वेगळा आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, अशी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.