नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यातर्फे आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना करण्यात आलेल्या मदतीवर भाजपचे खासदार आर.के. सिंग यांनी असहमती दर्शविली आहे. कोणत्याही फरार व्यक्तीला मदत करणे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचेच आहे, असे सिंग यांनी म्हटले आहे. ललित मोदी यांना कायद्यासमोर उभे करण्यासाठी भारतात परत आणण्याच्या दिशेने सरकारने पाऊल उचलले पाहिजे, असे आवाहन सिंग यांनी केले. तथापि, भाजपने स्वराज व राजे या नेत्यांचा बचाव केलेला आहे.स्वराज व राजे यांनी ललित मोदी यांना मदत केल्याच्या संदर्भात आर.के. सिंग यांनी केलेली टिपणी ही सत्तारूढ भाजपची ‘ललितगेट’प्रकरणावरील पहिलीच कठोर जाहीर प्रतिक्रिया आहे. ललितगेट प्रकरण उघडकीस आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारला राजकीय वादळाचा सामना करावा लागत आहे. माजी गृहसचिव आर.के. सिंग म्हणाले, ‘जर एखादी व्यक्ती कुणा फरार आरोपीची मदत करीत असेल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. असे करणे कायदेशीर आणि नैतिकदृट्या चुकीचे आहे. जर कुणी एखाद्या फरार व्यक्तीची भेट घेत असेल तर तेही गैर आहे. ज्या कुणी ललित मोदींना मदत केली आहे, माझ्या मते ते सर्व चुकीचे आहे.’ तथापि, सिंग यांनी स्वराज वा राजे यांचा नामोल्लेख मात्र केला नाही. ललित मोदी, स्वराज आणि राजे यांचा बचाव केला जात आहे काय, असे विचारले असता सिंग म्हणाले, ‘संबंधित विभाग आपले काम करीत आहे. कुणाचे नाव घेण्याची माझी इच्छा नाही. ललित मोदींना त्यांचा पासपोर्ट परत करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केंद्राने अपील करायला पाहिजे व आवश्यकता पडल्यास मोदींची संपत्तीही जप्त केली पाहिजे.’(लोकमत न्यूज नेटवर्क)
ललितगेट प्रकरणावरून भाजपमध्येच दुफळी
By admin | Published: June 24, 2015 12:14 AM