नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतरही आपल्याला अद्याप प्रदेशाध्यक्षपद सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या नाही. तसेच आपणही पक्षाकडे राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला नसल्याचे भाजपनेते मनोज तिवारी यांनी सांगितले. दिल्लीत भाजपची सत्ता येणार असा दावा करणाऱ्या मनोज तिवारींच्या नेतृत्वात भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
दिल्लीतील पराभवानंतर खुद्द मनोज तिवरींनीच प्रदेशाध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव भाजपच्या पदाधिकाऱ्यांसमोर ठेवले होता, असा दावा पीटीआयने सुत्रांच्या सांगण्यावरून केला होता. मात्र त्यावर तिवारी यांनी असं काही झालं नसल्याचे सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, मला कोणीही राजीनामा देण्यासाठी सांगितले नाही. तसेच मी देखील राजीनामा देण्याचा प्रस्ताव पक्षासमोर ठेवला नाही. यावर निर्णय घेणे हा पक्षांचा अंतर्गत मुद्दा आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या तिवारांना दिल्ली भाजपची धुरा सांभाळून तीन वर्षे झाली आहेत. भाजपची संघटनात्मक निवडणूक गेल्या वर्षी होणार होती. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक लांबणीवर गेली आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ आठ जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. तर आपने 62 जागा जिंकून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे.