- शीलेश शर्मा नवी दिल्ली : मोदी सरकारला सर्व विरोधक भ्रष्ट वाटतात; परंतु त्यांना भाजपा नेत्यांचा भ्रष्टाचार दिसत नाही. एवढेच नाही, तर विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी सीबीआयसह अन्य संस्थांचाही सर्रास वापर केला जात आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे उच्चाटन करण्यासाठी करण्यात आलेले कायदे हे सरकार कमकुवत करीत आहे, अशा परखड शब्दांत काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला.लोकपालांची नियुक्ती का केली जात नाही? व्हिसल ब्लोअर विधेयकातील तरतुदी बोथट का केल्या? अखेर ते कोणाला पाठीशी घालू पाहत आहेत? अशा प्रश्नांची सरबत्ती करून काँग्रेसचे अभिषेक सिंघवी, राजीव गौडा यांनी सरकारवर निशाणा साधला.व्यापमं, ललित मोदी, महाराष्टÑातील मंत्र्यांचा भ्रष्टाचार मोदींना का दिसत नाही? आजवर काय कारवाई केली? त्यांच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांवर गुन्हे आहेत. मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मोठमोठी आश्वासने दिली होती.
भाजपाचा भ्रष्टाचार सरकारला दिसत नाही - काँग्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 1:47 AM