BJP RSS : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप आता मोठा पक्ष झाला आहे, आरएसएसची भाजपला गरज नाही, असे विधान केले होते. या विधानावर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांकडून भूमिका मांडण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि सहा संयुक्त महासचिवांच्या उपस्थितीत संघाची तीन दिवसीय बैठक संपली. अखिल भारतीय समन्वय बैठक केरळमध्ये झाली. आरएसएसच्या माहितीनुसार, या बैठकीत संघ विचारधारेशी सलग्नित ३२ संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील नेते सहभागी झाले होते.
जेपी नड्डाच्या विधानावर संघाची भूमिका काय?
संघाच्या बैठकीनंतर मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल माहिती दिली.
यावेळी जेपी नड्डा यांनी केलेल्या विधानाबद्दल बोलताना सुनील आंबेकर म्हणाले की, "आमच्या उद्दिष्टांबद्दलचे मूळ विचार सगळ्यांसाठी खूप स्पष्ट आहेत. अन्य मुद्दे सोडवले जातील. हा एक कौटुंबीक मुद्दा आहे. तो सोडवला जाईल. तीन दिवस इथे बैठक झाली. सगळ्यांनी भाग घेतला आणि सगळे काही सुरळीत झाले आहे."
यावेळी सुनील आंबेकर यांनी जातनिहाय जनगणनेबद्दल संघाची भूमिका मांडली. हा एक संवेदनशील मुद्दा असून, सामुदायिक स्तरावर समरसता आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काम केले जाईल, असेही ते म्हणाले.
जेपी नड्डा नेमके काय बोलले होते?
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, भाजपला संघाची गरज नाही. सुरूवातीला आम्ही कमकुवत होतो. तेव्हा संघाची गरज पडत होती. आज भाजपा सक्षम आहे. पक्ष स्वतः चालत आहे.