वायनाड (केरळ) : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अन्य सर्व राष्ट्र विचार चिरडायचे आहेत. त्यामुळेच त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रिया नको आहे, असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. ते येथे एका प्रचारसभेत बोलत होते. केरळचा राज्यकारभार नागपुरातून का चालवला जावा, असा सवाल करून ते म्हणाले की, केरळचा राज्यकारभार त्याची शहरे आणि खेड्यांद्वारे चालवला गेला पाहिजे. केरळमधील शाळा कशी असावी तसेच तेथील जनतेला काय हवे आहे, हे दिल्लीला कसे कळेल, असा सवालही त्यांनी केला.
खरेतर केरळी जनतेने भारताला हेच शिकवले आहे. सरकार लोकांशी जेवढे जवळ असेल तेवढे ते प्रभावी असेल, असे ते म्हणाले. भाजप, संघाला राष्ट्राविषयीचे अन्य सर्व विचार चिरडायचे आहेत. त्यामुळे त्यांना राज्यघटना व लोकशाही प्रक्रियेपासून मुक्ती हवी आहे, असा दावा त्यांनी केला. वायनाड मतदारसंघाचे खासदार असलेले राहुल येथून पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
भाजपच्या जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीच नाहीभाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यात गरिबांसाठी काहीही नाही, परंतु २०३६ ऑलिम्पिकसाठी बोली लावण्याबद्दल ते बोलत आहेत, असा घणाघात राहुल यांनी केंद्रावर केला. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी भाजप उत्सुक आहे. तामिळनाडूतील निलगिरी जिल्ह्याच्या धावत्या दौऱ्यादरम्यान त्यांनी थलूर येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारची गरिबांसाठी काय धोरणे आहेत, असा सवाल त्यांनी केला.
एक नेता ही संकल्पनाही देशवासीयांचा अपमानसत्ताधारी भाजपने देशावर ‘एक नेता’ ही कल्पना लादल्याचा आरोप करत हा देशातील जनतेचा ‘अपमान’ असल्याचे राहुल म्हणाले. भारत हा फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे व प्रत्येकाचा आदर केला पाहिजे, असे ते म्हणाले.