गुंडलुपेट (कर्नाटक) : काँग्रेस अजूनही तुष्टीकरणाचे राजकारण करते. काँग्रेस सरकारने दिलेले ४ टक्के मुस्लिम आरक्षण भाजपने संपवले. लिंगायत ओबीसी, एससी, एसटी समाजाला वाचवण्याचे काम भाजपने केले आहे. आम्ही सत्तेत आलो तर मुस्लिम आरक्षण परत आणू, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात.
कर्नाटकातील १० मे रोजीची विधानसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विकासाचे राजकारण विरुद्ध काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण याबाबत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले.
भाजप कर्नाटकात पूर्ण बहुमतांचे सरकार स्थापन करेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शाह यांनी लोकांना विचारले की, तुम्हाला मुस्लिम आरक्षण परत हवे आहे का?. मोदींच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिन सरकार स्थापन केले जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी येथील चामुंडी हिल्सवरील प्रसिद्ध प्राचीन मंदिराला भेट देऊन देवी चामुंडेश्वरीची पूजा केली. त्यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी मंदिराला प्रदक्षिणाही घातली.