नवी दिल्ली - कर्नाटकातील आगामी निवडणुकांसाठी भाजपाची मंगळवारी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. मात्र या बैठकीत तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या बैठकीत दोन गट आपापसात भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली आहे. निवडणूक सभेतील या तुंबळ हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं आणि राडा झाला.
डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री के. गोपालय्या यांनी ही बैठक आयोजित केली होती. हसन जिल्ह्यातमध्ये ही बैठक बोलावण्यात आली होती. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचे माजी सहकारी एन. आर. संतोष हे यावेळी बैठकीत भाषण करत होते. त्यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांच्या एका गटाने आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वादावादीचं रुपांतर मारहाणीत होऊन तुफान राडा
मंत्री गोपालय्या यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. यामुळे कार्यक्रमस्थळावरून मंत्र्यांनी काढता पाय घेतला आणि ते निघून गेले. मंत्री निघून जाताच भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गट वादावादी सुरू झाली. पुढे वादावादीचं रुपांतर मारहाणीत होऊन तुफान राडा झाला. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. एक व्यक्ती दुसऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. त्याचवेळी काही कार्यकर्ते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मोहन नाईक हे या घटनेत जखमी
संतोष यांच्या भाषणावर प्रश्न उपस्थित करणारे मोहन नाईक हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे मंत्री आणि संतोष यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच आतापर्यंत दोन्ही गटांपैकी कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.