भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 09:27 AM2019-01-17T09:27:46+5:302019-01-17T09:33:48+5:30

विरोधकांच्या एकूण देणग्यांच्या तुलनेत भाजपाला 12 पट देणग्या

BJP far ahead with 437 crore rupees in donations says report | भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

भाजपाचे अच्छे दिन! कॉर्पोरेट्सकडून तब्बल 400 कोटींच्या देणग्या

Next

नवी दिल्ली: कॉर्पोरेट कंपन्यांकडून भाजपाला सर्वाधिक देणग्या मिळत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं (एडीआर) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाला 437 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय आणि तृणमूल काँग्रेस यांच्या तुलनेत भाजपाला मिळालेल्या देणग्यांचं प्रमाण 12 पट आहे. 

उत्तर प्रदेशात भाजपाविरोधात समाजवादी पार्टीसोबत आघाडी करणाऱ्या बहुजन समाज पार्टीला 20 हजार रुपयांपेक्षा अधिकची देणगी मिळालेली नाही. बसपानं या संदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला लिखित स्वरुपात दिली आहे. देशातील राष्ट्रीय पक्षांना 20 हजारांहून अधिक रकमेच्या एकूण 4 हजार 201 देणग्या मिळाल्या आहेत. यातून मिळालेली रक्कम 469.89 इतकी आहे. यातील 437.04 कोटी रुपये एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. भाजपाला मिळालेल्या देणग्यांची संख्या 2,977 इतकी आहे.

भाजपाच्या तुलनेत काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांची संख्या आणि देणग्यांमधून मिळालेली रक्कम अतिशय कमी आहे. काँग्रेसला 777 देणग्यांच्या माध्यमातून एकूण 26.65 कोटी रुपये मिळाले आहेत. देशातील राष्ट्रीय पक्षांना 2017-18 मध्ये कॉर्पोरेट आणि व्यवसाय क्षेत्रातून एकूण 1,361 देणग्यांमधून 422.04 कोटी रुपये मिळाले. तर 2,772 वैयक्तिक देणग्यांच्या स्वरुपात 47.12 कोटी रुपये मिळाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्यांनी सर्वाधिक देणग्या भाजपाला दिल्या आहेत. या माध्यमातून भाजपाला 400.23 कोटी रुपये मिळाले आहेत. तर काँग्रेसला अवघे 19.29 कोटी रुपये मिळाले आहेत. 
 

Web Title: BJP far ahead with 437 crore rupees in donations says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.