भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:32 PM2023-07-28T13:32:10+5:302023-07-28T13:32:10+5:30
भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे.
आगामी काही महिन्यांत मध्य प्रदेश आणि राजस्थानसह चार राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. यांपैकी केवळ मध्य प्रदेशातच भाजप सत्तेवर आहे. याशिवाय छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणामध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल. या मोठ्या जबाबदारीची धुरा खुद्द गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत हे दोन्ही नेते दर आठवड्याला या चारही राज्यांचा दौरा करतील. भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे.
भाजपकडून या चार राज्यांच्या निवडणुकीसाठी, ज्या नेत्यांच्या खांद्यावर धुरा दिली आहे, त्यांपैकी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. ओम माथूर आणि मनसुख मांडविय यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रल्हाद जोशी, नितीन पटेल आणि कुलदीप बिश्नोई यांच्याकडे राजस्थानची धुरा देण्यात आली आहे. तर तर प्रकाश जावडेकर आणि सुनील बन्सल यांना तेलंगणात पाठविण्यात आले आहे. या सर्वांकडून अमित शहा आणि जेपी नड्डा संबंधित राज्यांतील भाजपच्या तयारीचा आढावा घेतील. त्यातही अमित शहा विशेषत: मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवर लक्ष केंद्रित करणार आहेत. तर, जेपी नड्डा यांच्याकडे राजस्थान आणि तेलंगणाची जबाबदारी असेल.
अमित शाह करताय MP आणि छत्तीसगडचे दौरे -
गेल्या काही आठवड्यांत अमित शाह यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अनेक दौरे केले आहेत. मध्य प्रदेशात त्यांनी नेत्यांना गटबाजीपासून दूर राहत काम करण्याचा सल्लाही दिला आहे. मध्य प्रदेशात पक्षाने प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कायम ठेवण्याचा संदेशही दिला आहे. याशिवाय सीएम शिवराज यांचा चेहराही वापरण्यात येणार आहे. ते सध्या चौथ्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत.