भोपाळ : राज्यसभेच्या निवडणुका जवळ आल्या असताना मध्यप्रदेशातील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले असून, तेथील काँग्रेसच्या एका आमदाराने विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपविला आहे. मात्र, आपल्याकडे कोणाचाही राजीनामा आलेला नाही, असे विधानसभा अध्यक्षांचे म्हणणे आहे.मध्यप्रदेशातून राज्यसभेवर तीन सदस्य जायचे आहेत. भाजपने सत्यनारायण जतिया व प्रभा झा यांची नावे नक्की केली आहेत. काँग्रेसतर्फे दिग्विजयसिंह उत्सुक असून, ज्योतिरादित्य सिंदिया यांनाही राज्यसभेवर पाठविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस व भाजप एकमेकांचे आमदार फोडून आपले दोन जण राज्यसभेवर जातील, असा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसचे व सरकारला पाठिंबा देणारे बसप व सपचे, असे एकूण १० आमदार मंगळवारी रात्री बेपत्ता झाले.>असे आहे पक्षीय बलाबलमध्यप्रदेश विधानसभेची सदस्यसंख्या २३० असून, सध्या दोन जागा रिकाम्या आहे. त्यात काँग्रेस व आघाडीचे मिळून ११५ सदस्य आहेत.भाजपचे १०७ आमदार आहेत. बसप (२), सप (१) व अपक्ष (४), अशा ७ आमदारांचा कमलनाथ सरकारला पाठिंबा आहे. आ. हरदीपसिंग डांग यांनी विधानसभा अध्यक्ष एन.पी. प्रजापती यांच्याकडे राजीनामा पाठवला. पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे, आपल्याला योग्य मान दिला जात नाही, अशी त्यांची नाराजी आहे, तसेच राज्यातील कोणीच मंत्री काम करीत नसून, ते भष्ट आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांना मंत्रिपद हवे असून, ते मिळाले, तर ते राजीनामा मागे घेतील, अशी चर्चा आहे. शिवाय त्यांचा राजीनामा मिळाला नसल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्यातच भाजपच्या एका आमदाराने मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाल्याने तो भाजप सोडणार का, असे बोलले जात आहे.
काँग्रेसला पाडण्यासाठी भाजपची फिल्डिंग, आमदारांची पळवापळवी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:35 AM