'पेट्रोल अ्न डिझेलवर एक्साईज ड्युटी वाढवून भाजपा आपली सुटकेस भरतेय'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 02:16 PM2020-05-06T14:16:14+5:302020-05-06T14:22:05+5:30
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही
नवी दिल्ली - केंद्र सरकारनेपेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्का(एक्साइज ड्युटी)त वाढ केली आहे. सरकारच्या आदेशानुसार पेट्रोल आणि डिझेलवर रोड सेसच्या स्वरूपात प्रतिलिटर आठ रुपये आकारले जातील. त्याचबरोबर विशेष अतिरिक्त शुल्क म्हणून पेट्रोलवर प्रतिलिटर 2 रुपये आणि डिझेलवर प्रतिलिटर 5 रुपये द्यावे लागणार आहेत. पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे 10 आणि 13 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. तसेच, भाजपा स्वत:ची सुटकेस भरण्याचं काम करत असल्याचा आरोपही प्रियंका यांनी केलाय.
पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 6 मेपासून लागू झाले असून, तेल कंपन्यां(ओएमसी)कडून हे शुल्क आकारलं जाणार आहे. पेट्रोल पंपावरील इंधनाच्या किरकोळ किमतीत कोणतीही वाढ होणार नाही. पेट्रोल आणि डिझेलची एमआरपी जशीच्या तशीच राहील. कोरोनाच्या महारोगराईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अलीकडील काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांनी किमतीत सातत्यानं घसरण सुरूच ठेवली होती. ही वाढ पूर्णपणे अतिरिक्त अबकारी शुल्काच्या स्वरुपात असल्याने त्याचा महसूल केंद्र सरकारला प्राप्त होईल, असे तेल कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या निर्णयावरुन काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे.
''कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात झाली असून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा मिळायला हवा. मात्र, भाजपा सरकार सातत्याने एक्साईज ड्युटी वाढवत असून जनतेला मिळणारा सगळा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे.
दरकपातीचा फायदा जनतेला भेटत नसून जो पैसा सरकारला भेटत आहे, त्यातूनही मजूर, मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योजकांची मदत होताना दिसत नाही. अखेर सरकार पैसा कुणासाठी जमवतं आहे?'' असा सवालही प्रियंका गांधींनी विचारला आहे. प्रियंका गांधींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केले.
.. किसानों की और उद्योगों की मदद हो नहीं रही है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 6, 2020
आख़िर सरकार पैसा इकट्ठा किसके लिए कर रही है? 2/2
दरम्यान, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट वाढविण्यात आल्याने इंधनाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. डिझेलवरील व्हॅटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याने हे दर भडकले आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलवर असलेला व्हॅट २७ टक्क्यांवरून ३० टक्के वाढविण्यात आला आहे. त्याचबरोबर डिझेलवर आता ३० टक्के व्हॅट आकारला जाणार आहे. आतापर्यंत डिझेलवर १६.५ टक्के व्हॅट होता. तो आता जवळपास दुप्पट केला गेला आहे. यामुळे आता दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रतिलिटर अनुक्रमे ७१.२६ आणि ६९.३९ रुपये असतील.